देशातील दलित, शोषित व वंचित बहुजन घटकांचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर – प्रा. दिवाकर यांचे प्रतिपादन

साताप्पा कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे नेते नसून, देशातील सर्व शोषित, वंचित व बहुजन वर्गाचे उद्धारकर्ते आहेत. ते खऱ्या अर्थाने भारतीयांचे दैवत आहेत,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. आर. के. दिवाकर यांनी केले.

ते शेंडूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श शताब्दी महोत्सव कमिटीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे व्हाईस चेअरमन शिवाजी कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंडूर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. उज्ज्वला कांबळे होत्या.

प्रा. दिवाकर म्हणाले, “भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणून न्याय देण्याचे महान कार्य केले. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.”  

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. अजित कांबळे म्हणाले, “डॉ. आंबेडकरांनी भारतीयांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. त्यांच्या विचारांचे समाजात दृढपणे रोपण होणे आवश्यक आहे.” शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी, “डॉ. आंबेडकरांचा निपाणीत झालेला पहिला पदस्पर्श साजरा करण्यासाठी हा शताब्दी महोत्सव आनंदोत्सव म्हणून सर्व जातीधर्मातील लोकांनी साजरा करावा,” असे आवाहन केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य गोपाळ मामा सूर्यवंशी, युवराज धोंडफोडे, एस. डी. कांबळे, बाबासाहेब कांबळे, जनार्दन मोहिते, सुशील कांबळे, सुरेश कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिलांची उपस्थिती होती.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष