रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी जयसिंगपूरतर्फे सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी, जयसिंगपूर यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, टाकळी येथील गरीब आणि होतकरू विद्यार्थिनींना मोफत सायकली वाटप करण्यात आल्या. उद्योजक अविनाश मगदूम यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या सहा सायकलींचे वाटप प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून क्लबचे अध्यक्ष राकेश पारेख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे सदस्य शिवराज पाटील, सुनील परिट, आशिष गायकवाड, इर्शाद शेख आणि आसिफ देसाई उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी विविध सामुदायिक सेवा प्रकल्पांमध्ये सक्रिय असून, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यावरणीय उपक्रमांवर त्यांचा भर आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी हा सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील, उद्योजक अविनाश मगदूम, शिवसेना तालुका संघटक संभाजी गोते, बबन काटकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एस. खोपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उदय पाटील यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा