शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत: आमदार यड्रावकर

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजना शेवटच्या शेतकरी घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, योजनांची परिपूर्ण माहिती त्यांना मिळावी त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्वतंत्र स्टॉल उभे करावेत व त्या स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. जयसिंगपूर येथे या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

आमदार यड्रावकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण व त्रुटींची पूर्तता करण्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे. प्रदर्शनाद्वारे शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. या प्रदर्शनामध्ये कृषी विभागाचे दालन व प्रात्यक्षिक सादर केले जाणार असून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

या प्रदर्शनामध्ये ऊस व भाजीपाला अंतरपीक लागवड तंत्रज्ञान, क्षारपड जमीन सुधारणा, सचिद्र पाईप प्रणालीद्वारे निचरा तंत्रज्ञान, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत फळबाग लागवड योजना, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) यामध्ये यशस्वी उद्योजकांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.

तसेच, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना, ठिबक सिंचन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, संरक्षित शेती फलोत्पादन योजना (ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस), भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, व ऊस पाचट व्यवस्थापन यासारख्या योजनांची प्रात्यक्षिके लाईव्ह सादर करण्यात येणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले.

या बैठकीला शिरोळ तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे, मंडल कृषी अधिकारी प्रकाश फाळके, संपतराव मुळीक, कृषी पर्यवेक्षक संजय सुतार, पंचायत समिती कृषी अधिकारी दीप्ती बावधनकर, शरद कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य सरिता कोळी तसेच महाविद्यालयाचा स्टाफ उपस्थित होता.

दरम्यान राज्यस्तरिय शरद कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी शेतकरी यांच्या अडी - अडचणी सोडवणूक, ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्जाची छानणी यासाठी शरद कृषी प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे दालन असणार आहे. यामध्ये शेतीसंबधीत प्रात्यक्षिक मांडण्यात येणार आहेत. पंतप्रधान किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडवणूक, ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्जाची छानणी करण्यात येणार आहे. तक्रारीचे अथवा त्रुटींची पुर्तता देखील या प्रदर्शानात कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष