संविधानाच्या माध्यमातून जो जीवन जगत असतो तो देवाच्या अगदी जवळ असतो : पूज्य आचार्यश्री विशुद्धसागर महाराज

 जयसिंगपूर येथे सर्वधर्मीय देशभक्तीपर प्रवचन संपन्न

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

भारतीय संविधानात प्रभू श्रीराम, भगवान महावीर यांच्या प्रतिमांचे तत्व आहे. त्यामुळे हे पवित्र संविधान आपण जपले पाहिजे. संविधानाशिवाय आपण जगू शकत नाही. संविधानाच्या माध्यमातून जो जीवन जगत असतो तो देवाच्या अगदी जवळ असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान असे तयार केले आहे की, जे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. लाखो अपराधी वाचले तरी चालतील पण एकाही निरप्राधाला शिक्षा झाली नाही पाहिजे, हे जगातील कोणत्याही संविधानात लिहिले नाही, ते आपल्या संविधानात आहे. त्यामुळे भारताचे संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधानाच्या वाटेवर आपण चालणे गरजेचे आहे. असा उपदेश पूज्य आचार्यश्री विशुद्धसागर महाराज यांनी दिला.

जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वधर्मीय देशभक्तीपर मंगल प्रवचन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. 

प्रारंभी स्वागत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. आचार्य श्री १०८ चंद्रप्रभसागरजी महाराज यांनी पूज्य आचार्य श्री विशुद्धसागर महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यासह ससंघ उपस्थित होते. दीप प्रज्वलन व पादपूजा सर्व समाज अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

नमोकार मंत्राने पूज्य श्री विशुद्धसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, जीवनात काही प्राप्त करायचे असेल तर सहन करायची शक्ती पाहिजे. आपले जीवन जगत असताना स्त्रियांनी आपल्या पतीला रामाच्या रूपात पाहिले पाहिजे तर पतीने आपल्या पत्नीला सिताच्या रूपात पाहिले पाहिजे तरच सुखी संसार होईल. लोभाची अपेक्षा कोणीही करू नका, अन्यथा आपले जीवन व्यर्थ होईल. भावा - भावांनी प्रभू राम आणि लक्ष्मण प्रमाणे आपले जीवन जगावे, ज्यावेळेला वाटणीचा विचार येईल त्यावेळेला त्याला मर्यादित मिळेल मात्र एकजूट होऊन जे भाऊ राहतील त्यांचं कल्याण होईल. भारत हा दयाळू राष्ट्र आहे. मात्र, इंग्रजांनी या दयाळूपणाचा मोठा फायदा घेतला. व्यापारी म्हणून आले आणि आपल्या अखंड भारताचे तीन तुकडे केले. यामध्ये पाकिस्तान बांगलादेश आणि भारत यांचा समावेश आहे. त्यामुळे कोणावरही दया दाखवताना त्याची परीक्षा नक्की घ्या. 

अहिंसेच्या मार्गाने ज्या वेळेला जाल त्या - त्या वेळी प्रत्येक घराघरात प्रभू राम, भगवान महावीर यांच्यासारखे दैवत जन्माला येतील. त्यामुळे अहिंसेच्या मार्गाने चला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मला जयसिंगपूर येथे प्रवचन करण्याची संधी मिळाली, जयसिंगपूरला आल्यानंतर मला प्रभू हनुमानाची आठवण आल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्षा स्वरूपाताई पाटील यड्रावकर, राजेंद्र झेले, मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव घुणकीकर, प्रकाश झेले, मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर तेरापंथचे अध्यक्ष बहादुर बरडिया, शैलेश चौगुले, सुभाष हातगिने, सुरेश रेळेकर, कनक शहा, भगवंत जांभळे यांच्यासह सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष