कडाडणारी हलगी अबोल झाली ; हलगीपट्टू सुनिल गायकवाड यांचे निधन

 


संतोष तारळे / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड गावाच्या सांस्कृतिक इतिहासाला हलगीच्या ठेक्याने जागतिक ओळख देणारे प्रसिद्ध हलगी वादक सुनील गायकवाड यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबीय नव्हे, तर संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. कोणत्याही गावातील उत्सवाला, मंगलकार्यासाठी त्यांच्या हलगीचा आवाज हवाच असे. त्यांचा ठेका वाजला की उपस्थित मंडळीही उत्साहाने थरारून जात. त्यांच्या वादनामुळे प्रत्येक कार्यक्रमाचा जीव ओतला जात असे. हलगीचा हा कडाडता आवाज आज शांत झाला असला, तरी त्यांचा ठेका गावकऱ्यांच्या हृदयात कायम वाजत राहील.

सुनील गायकवाड यांनी आपल्या आयुष्यभर हलगी वादनाच्या माध्यमातून गावाची ओळख दुरवर पोहोचवली. त्यांच्या हातून कडाडणारी हलगी फक्त एक वाद्य नव्हे, तर गावकऱ्यांच्या भावना व्यक्त करणारा आवाज होता. विशेष म्हणजे, त्यांनी पैशाचा लोभ कधीही बाळगला नाही. कार्यक्रमात जे मिळेल, त्या समाधानात ते कायम आनंदी राहिले. अशा मितभाषी, प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्वाची एक्झिट गावासाठी मनाला चटका लावणारी ठरली आहे.

हलगी वादन हे गायकवाड कुटुंबाचे पिढीजात काम. सुनील गायकवाड यांचे वडील, दिवंगत दत्तू सिद्राम गायकवाड, हे देखील प्रसिद्ध हलगी वादक होते. त्यांचाच वारसा पुढे नेत सुनील यांनी या कलेला एक वेगळेच स्थान मिळवून दिले. त्यांच्या हलगी वादनाने अनेक कार्यक्रमांमध्ये नुसते रंगतच आणली नाही, तर कार्यक्रमांची खरी सुरुवात त्यांच्या ठेक्याने व्हायची. गावकरी म्हणतात की, "हलगी सुनील गायकवाड यांच्या हातात आली की ती एक वेगळ्याच उंचीवर पोचायची.

सुनील गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरीही त्यांचे चिरंजीव योगेश गायकवाड हलगी वादनाची परंपरा पुढे चालवत आहेत. वडिलांचा अभिमान बाळगून त्यांनी ही कला पुढे नेत गावाच्या संस्कृतीला चालना देत आहेत. गावकऱ्यांना विश्वास आहे की सुनील यांची कला त्यांच्या मुलाच्या हातातून नव्या उंचीवर पोहोचेल.

आजही हेरवाड गावात सुनील गायकवाड यांच्या हलगीच्या आठवणी लोकांच्या मनात जिवंत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष