राजारामबापू पाटील कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास मार्गदर्शन करणार : गणपतराव पाटील
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शेती क्षेत्रामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करण्याची गरज आहे. यासाठी विचारांची देवाणघेवाण होऊन सुसूत्रता ठेवून काम केले पाहिजे. श्री दत्त कारखान्याने क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. राजारामबापू पाटील कारखान्यानेही त्यांच्या कार्यक्षेत्रात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबवल्यास, सर्व ती मदत व मार्गदर्शन करण्यास आपण तयार आहोत, अशी ग्वाही श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि. राजारामनगर, इस्लामपूरचे चेअरमन प्रतिक पाटील यांच्यासह सर्व संचालक व कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांनी आज श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा पाहणी दौरा केला. यामध्ये त्यांनी क्षारपड जमीन सुधारणा योजना, माती परीक्षण विभाग आणि शेडशाळ येथील देशी वाण बीज बँकेला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी गणपतराव पाटील बोलत होते.
प्रारंभी श्री दत्त कारखाना कार्यस्थळी गणपतराव पाटील यांनी प्रतिक पाटील व सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून क्षारपड जमीन योजनेची संपूर्ण माहिती आणि आढावा सादर केला. चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनीही योजनेची माहिती दिली. सुपर केन नर्सरी, सेंद्रिय शेती, पुरबुडीत क्षेत्रात बीट लागवड, क्षारपड मुक्तीचे प्रयोग, बियाणे मळा तयार करणे, ऊस उत्पादन वाढीसाठीच्या विकास योजना, बँक कर्जपुरवठा, शेतकरी संस्था स्थापन करून प्रत्यक्षात काम करण्याची पद्धत आदी विविध बाबीवर चर्चा झाली. शंकांचे निरसन करण्यात आले. आगामी काळात दोन्ही कारखान्याच्या वतीने विचारांची देवाण-घेवाण करून क्षारपड जमीन सुधारणा योजनेला गती देण्याचे ठरविण्यात आले.
कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादकांसाठी प्रकाशित केलेल्या 'शाश्वत ऊस शेतीचा दत्त पॅटर्न' ही पुस्तिकाही सर्वांना देण्यात आली. कॉन्ट्रॅक्टर किर्तीवर्धन मरजे व सुदर्शन तकडे यांनी प्रत्यक्षात काम कसे केले जाते याची माहिती सांगितली.
श्री दत्त कारखान्याच्या वतीने शिरोळ आणि परिसरातील 23 गावामध्ये क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे काम झाले आहे. शिरोळ व घालवाड या ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम सर्वांनी प्रत्यक्षात जाऊन पाहिले. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या बरोबर संवादही साधला.
यावेळी संचालक दरगु गावडे, इंद्रजित पाटील, माती परीक्षण अधिकारी ए. एस. पाटील, बाबासाहेब पाटील, रमेश पाटील, गजानन चौगुले, लियाकत सय्यद, संजय चव्हाण, अशोक माने यांच्यासह राजारामबापू पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय पाटील, देवराज पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, प्रताप पाटील, बबन थोटे, अमरसिंह साळुंखे, हणमंत माळी, वैभव साळुंखे पाटील, मनोहर सन्मुख, शैलेश पाटील, दीपक पाटील, सतीश मोरे, राजकुमार कांबळे, आप्पासो हाके, दिलीप देसाई, अतुल पाटील, जगन्नाथ पाटील, सुजयकुमार पाटील, विश्वजीत थोरात उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा