माणगाव बुलेट व कवठेपिरान पंखा या बैलजोडीने मारले हेरवाडचे मैदान
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथे हजरत ख्वाजा शमनामिरा दर्ग्याच्या उरसानिमित्त आयोजित चित्तथरारक शर्यतीत माणगाव बुलेट व कवठेपिरान पंखा या बैल जोडीचे गाडीवान सचिन खोत यांनी पहिला क्रमांक पटकावून मैदान गाजवले. या शर्यतीत शर्यतीप्रेमींची मोठी गर्दी, हलगीच्या कडकडाटात एकापेक्षा एक जातिवंत बैल, घोडे, आणि आत्मविश्वासाने भरलेले गाडीवान या मैदानात पाहायला मिळाले.
हेरवाड - बोरगाव मार्गावरील मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. सचिन खोत यांच्या बैलजोडीने वाऱ्याच्या वेगाने धाव घेत पहिला क्रमांक पटकावला. करण अतिग्रे यांच्या बैलजोडीने दुसरा क्रमांक, रेंदाळ येथील राजीव मोरे यांच्या बैलजोडीने तिसरा तर मजरेवाडी येथील मनोज बंडगर यांच्या बैलजोडीने चौथा क्रमांक मिळवला.
याशिवाय जनरल घोडा-बैलगाडी स्पर्धेतही मोठी रंगत पाहायला मिळाली. या स्पर्धेत आकडे येथील भूतोबा प्रसन्न यांच्या गाडीने पहिला क्रमांक, बोरगाव येथील वसवाडे यांच्या गाडीने दुसरा तर शिरोळ येथील अमर महात्मे यांच्या गाडीने तिसरा क्रमांक मिळवला.
जनरल घोडागाडी स्पर्धेतही उत्कंठा शिगेला पोहोचली. सुरज अपराज यांच्या घोडागाडीने पहिला क्रमांक पटकावला, हेरवाड येथील सोन्या यांनी दुसरा, तर अजीम जमादार यांच्या घोडागाडीने तिसरा क्रमांक मिळवला.
यावेळी स्थानिक शर्यती शौकिनांनी मोठ्या उत्साहात स्पर्धेचा आनंद घेतला. बैलजोड्या आणि घोड्यांच्या तडफदार धावण्या आणि गाडीवानांच्या कौशल्याने उपस्थितांची दाद मिळवली. शर्यतींनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आणि उरसाच्या पारंपरिक रंगात भर घातली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक समिती व आयोजक मंडळाने विशेष मेहनत घेतली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा