आजचे विद्यार्थी सुसंस्कारित झाले तरच देशाचे आधारस्तंभ बनतील : डॉ कुमार पाटील
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
आजचे विद्यार्थी योग्य आहार,विहारासह सुविचार, सदाचार,सुसंगती आणि सद्गुरूंचा आशीर्वाद या गुणांनी युक्त होऊन सुसंस्कारीत झाले तरच ते देशाचे भावी आधारस्तंभ बनतील व यशवंत,गुणवंत किर्तीवंत होऊन शाळेसह गावाचे नाव उज्वल करतील असे विचार लेखक, कवी व श्री दत्त कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट शिरोळ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील यांनी व्यक्त केले. ते शिरोळ येथील कन्या वि. मं. नं. 2 व डॉ सुनील दादा पाटील संचलित महाराष्ट्राचे साहित्यीक व सांस्कृतीक महामंडळ संस्थेच्या वतीने आयोजित 'आनंददायी शनिवार' या उपक्रमांतर्गत'लेखक आपल्या भेटीला' व 'ग्रंथालय आपल्या दारी' या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.कवितासागर प्रकाशनाचे संपादक व लेखक श्री. डॉ सुनील पाटील यांनी 60 हुन अधिक पुस्तके भेट देऊन वाचनसंस्कृती बळकटीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. लेखिका व कवयित्री सौ. मेघा उळागड्डे यांनी कविता सादर करुन आधारस्तंभ कथेद्वारे मुलींना मंत्रमुग्ध व भावनिक केले, सौ. संजीवनी पाटील आणि बाल लेखक प्रिन्स सुनील पाटील यांनी मुलींना मार्गदर्शन केले व प्रकट मुलाखत दिली .वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कविता, कथा सादर केल्या. तसेच मुलींना वाचनाची गोडी लागावी यासाठी पुस्तके भेट दिली. प्रमुख पाहुणे श्री डॉ. कुमार पाटील यांनी आरोग्य आणि आहार याविषयी मुलींना मार्गदर्शन केले.मुलींनी उपस्थित मान्यवरांना प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधला.कार्यक्रमासाठी शिरोळ कन्या विद्या मंदिर क्र 2 शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष,सदस्य तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व पालक व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा