जीबीएस सिंड्रोमने निपाणी तालुक्यातील पहिला बळी – ढोणेवाडीतील घटना

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

 – निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी येथील बाळगोंडा भाऊसो पाटील (वय 64) यांचे गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजाराने निधन झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवार, दि. 15 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

तालुक्यातील जीबीएस सिंड्रोममुळे झालेला हा पहिला मृत्यू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांत जीबीएस सिंड्रोम ग्रामीण भागातही पसरत असल्याची लक्षणे दिसून येत आहेत. ढोणेवाडीतील एका चौथीच्या विद्यार्थ्याला जीबीएसची लक्षणे आढळून आल्याने त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दरम्यान, ढोणेवाडी वार्ड क्रमांक ३ मधील ६४ वर्षीय बाळगोंडा पाटील यांनाही या आजाराची लागण झाली.

दि. ८ रोजी त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. आठ दिवसांपासून उपचार सुरू असतानाही त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

ढोणेवाडीत जीबीएसमुळे मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांमध्ये चिंतेची भावना असून, संक्रमित रुग्णांवर तातडीने उपचार होण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिकांची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष