सांगवडेतील तलाठी, कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे गावातील तलाठी आणि कोतवाल यांनी वारस नोंदणीसाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी अॅन्टी करप्शन ब्युरोच्या (ACB) पथकाने तपास करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
तक्रारदार यांची सांगवडे गावातील गट क्रमांक 76 आणि 77 या शेतजमिनीवर वारस नोंदणीसाठी तलाठी अविनाश मधुकर कोंडीग्रेकर आणि कोतवाल सर्जेराव बंडा कुंभार यांनी 5,000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 3,000 रुपयांवर आली. तक्रारदाराने हा प्रकार अॅन्टी करप्शन ब्युरोकडे (ACB) सांगितल्यानंतर पडताळणी केली असता लाच मागणीचा प्रकार सिद्ध झाला.
तपासादरम्यान, कोतवाल सर्जेराव कुंभार यांनी तलाठी कोंडीग्रेकर यांच्या संमतीने तक्रारदाराकडे 3,000 रुपयांची लाच मागितली आणि ती स्विकारण्यासाठी प्रवृत्त केले. यामुळे दोघांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांच्या पथकाने केली. पोलीस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी आणि पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई पूर्ण केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा