कृष्णा-वेणी यात्रेसाठी शेती देण्यास काही शेतकऱ्यांचा विरोध; कृती समितीच्या वतीने शुक्रवारी कुरुंदवाड बंदची हाक
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथे कृष्णा नदी तीरावर भरणाऱ्या कृष्णा-वेणी यात्रेसाठी काही शेती 15 दिवसांसाठी राखीव ठेवण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, यंदा काही शेतकऱ्यांनी यात्रा मैदानासाठी शेती देण्यास मज्जाव केला आहे.या निषेधार्थ शुक्रवारी सर्वपक्षीय कृती समितीने शहर बंदची हाक दिली आहे.
काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, बाबासाहेब सावगावे, राष्ट्रवादीचे तानाजी आलासे, भाजपचे संजय डोंगरे,दलित सेनेचे सुनील कुरुंदवाडे, शिवसेना (शिंदे गट)चे सोमेश गवळी, शेतकरी संघटनेचे अविनाश गुदले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
दरम्यान, एका शेतकऱ्याने शासनाच्या रस्ता मोजणीविरोधात याचिका दाखल केली आहे.मात्र यात्रेसाठीच्या राखीव शेतीबाबत कोणतीही याचिका उच्च न्यायालयात दाखल नाही, असा खुलासा समितीने केला आहे. काही शेतकरी दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.
यात्रेच्या व्यवस्थापनासाठी काही शेती तात्पुरत्या स्वरूपात 20दिवसांसाठी वापरली जाते. नियोजनासाठी आठ दिवस अगोदर यात्रा कमिटीच्या ताब्यात घेतली जाते आणि यात्रेनंतर ती पुन्हा शेतकऱ्यांना परत केली जाते.पालिकेने सालाबादप्रमाणे शेतकऱ्यांना 3 वेळा नोटीस दिली आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी जागा देण्यास मज्जाव केल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कृषी व पशुपालन क्षेत्राशी निगडित आणि शेतकऱ्यांच्या मनोरंजनाशी भावना जुळवणारी ही यात्रा आहे.तिच्यावर कोणताही आघात सहन केला जाणार नाही.यात्रेच्या आयोजनावर आलेले संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पालकमंत्री प्रकाश अबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांत अधिकारी मोसमी चौगुले, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावर लवकर निर्णय न घेतल्यास बेमुदत शहर बंद करण्याचा इशारा कृती समितीने प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकावर दयानंद मालवेकर, माजी नगरसेवक राजू आवळे,दीपक गायकवाड,रमेश भुजुगडे,जय कडाळे,सुरेश बिंदगे,जितेंद्र साळुंखे, कुमार माने, बबलू पवार,अजित देसाई, एन डी पाटील, अभय पाटुकले,शंकर पाटील, विष्णुपंत माळी,दीपक पोमाजे,रामभाऊ मोहिते,अनुप मधाळे,बापूसाहेब आसंगे, सरफराज जमादार,शाहीर आवळे,आयुब पट्टेकरी,अर्शद बागवान,प्रवीण खबाले,उमेश कर्णाळे,असिफ घोरी,सर्जेराव बागडी, आदींच्या सह्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा