शिरोळ वैद्यमापन कार्यालय असून अडचण.. नसून खोळंबा



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तहसील कार्यालयाच्या इमारतीत असणारे वैद्यमापन कार्यालय सध्या अक्षरशः ठप्प झाले आहे. या कार्यालयाचा कार्यभार कोल्हापूरच्या एका अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असून, ते येथे क्वचितच उपस्थित राहतात. परिणामी, कार्यालय कायम कुलूपबंदच असते. फक्त एका शिपायावर संपूर्ण तालुक्याचा भार असल्याने नागरिकांच्या तक्रारींना कोणतेही प्रतिसाद मिळत नाहीत.

शिरोळ तालुक्यातील व्यापारी, किरकोळ विक्रेते तसेच सामान्य नागरिकांना वैद्यमापन कार्यालयाच्या सेवांची गरज असते. वजन काट्यांची तपासणी, प्रमाणपत्रे, तक्रारींचे निराकरण यांसाठी नागरिक कार्यालयात येतात, मात्र येथे कोणीच उपलब्ध नसते. नागरिक वारंवार हेलपाटे मारूनही समाधान मिळत नाही.

या कार्यालयात एकच शिपाई कार्यरत असून त्याच्यावर संपूर्ण तालुक्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत शिपायालाही निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. वजन मापनासंबंधीच्या नियमांचे पालन होते का, याची तपासणीसुद्धा होत नाही. परिणामी, अनेक व्यापारी बोगस प्रमाणपत्रांवर व्यवसाय करतात, तर ग्राहकांची फसवणूक होते.

या समस्येबाबत स्थानिक प्रशासनास वारंवार तक्रारी केल्या जात आहेत, मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही. कोल्हापूर येथील अधिकाऱ्यांकडून येथे नियमित भेटी दिल्या जात नाहीत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठीही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शिरोळ वैद्यमापन कार्यालय सुरळीत सुरू राहण्यासाठी येथे पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची आवश्यकता आहे. तसेच, कर्मचाऱ्यांची भरती करून कार्यालय चालू स्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा, नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

तालुका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गाकडून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष