छावा चित्रपट प्रत्येक शाळेत दाखवला जावा : मनोहर भोसले
सैनिक टाकळी येथील विद्यार्थ्यांसाठी झाला छावाचा स्पेशल शो
सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क :
नव्या पिढीला स्वराज्याचा इतिहास आणि छत्रपतींचा पराक्रम समजावून सांगताना भविष्यात काही पुरावे दाखवावे लागणार आहेत यासाठी किल्ले आहेतच पण अफजलखान आणि औरंगजेबाची कबर सुद्धा साक्षीला असावी. त्या नष्ट करू नयेत. जेवढी कबर आहे तेवढी चादर असेल तर समस्या निर्माण होणार नाही असं मत लेखक मनोहर भोसले यांनी व्यक्त केले आहे. ते सैनिक टाकळी येथील विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवताना बोलत होते.
सैनिक टाकळी येथील माजी सैनिक कल्याण मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कुमार विद्यामंदिर,कन्या विद्या मंदिर व संभाजीनगर येथील जि.प. शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना भोसले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज अथवा छत्रपती संभाजी महाराज हे मुसलमानांचे शत्रू नव्हते. त्यांनी आठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभा केलं होतं. स्वराज्यावर चाल करून आलेला अफजलखान,औरंगजेब अक्रांता होता. त्यांनी केलेले अत्याचार निश्चितच क्रूर होते. पण त्यांचा शेवट महाराष्ट्रातच झाला. नव्या पिढीला स्वराज्याचा इतिहास समजून सांगणे गरजेचे आहे यासाठी प्रत्येक शाळेत छावा चित्रपट दाखवला जावा असे ते म्हणाले.
यावेळी कुमार विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा बाबर, कन्या विद्या मंदिर चे मुख्याध्यापक रविंद्र जाधव, संभाजीनगर येथील जि प शाळेचे मुख्याध्यापिक कोळी सर, सौ. शुभांगी चव्हाण,व्हि.के. माने सर,माजी सैनिक कल्याण मंडळाचे ऑ.ले बी एस पाटील, आनंदराव पाटील,चंद्रकांत भोसले,संदीप माने,प्रदीप पाटील,आदींसह विद्यार्थी, विद्यार्थीनी व काही पालक उपस्थित होते.शिवार न्यूज साठी संजय चव्हाण

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा