'मराठा जोडो अभियान' तथा जिजाऊ रथयात्रेचे शिरोळ तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत होणार
शिरोळ तालुक्यातील मराठा बांधवांची बैठक संपन्न
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
मराठा समाजाच्या संघटनासाठी आणि सामाजिक एकजुटीसाठी मराठा सेवा संघ, महाराष्ट्र संचलित ‘मराठा जोडो अभियान तथा जिजाऊ रथयात्रा 2025’ च्या कोल्हापूर जिल्ह्यातील दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 21 मार्च 2025 रोजी रथयात्रेचे जिल्ह्यात आगमन होणार असून, 22 मार्च रोजी सकाळी 9 वाजता कोल्हापूर शहरातून यात्रा प्रारंभ होईल, अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर यांनी नियोजन बैठकीत दिली.
रथयात्रेच्या प्रभावी आयोजनासाठी रविवारी सकाळी 10:30 वाजता कुरुंदवाड-तेरवाड रस्त्यालगतच्या मराठा मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील विविध गावांतील मराठा चळवळीतील नेते, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी बाबर यांनी जिजाऊ रथयात्रेचा नियोजित मार्ग जाहीर केला. रथयात्रा गडमुडशिंगी, पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, अब्दुललाट, शिरडवाड, हेरवाड, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, शिरोळ, जयसिंगपूर आणि उदगाव येथे स्वागत समारंभ पार पाडून सांगली जिल्ह्यातील अंकलीकडे प्रस्थान करणार आहे.
मराठा समाजाने आपल्या हक्कांसाठी, न्यायासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी संघटित होण्याची गरज आहे. समाजाची संघटन, शिक्षण, रोजगार, सामाजिक आणि आर्थिक उन्नती यासंदर्भात जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रभर मार्गक्रमण करत ‘मराठा जोडो अभियान व जिजाऊ रथयात्रा 2025’ समाजाला एकसंघ करण्याचा ऊर्जावान संदेश देईल, असेही बाबर यांनी नमूद केले.
प्रत्येक गावात रथयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करावे, मराठा समाजाने मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन ऐतिहासिक घडामोडीचा साक्षीदार व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीस हेरवाडचे उपसरपंच भरत पवार, आंदोलन जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, तालुका अध्यक्ष नागेश काळे, मराठा नेते सागर धनवडे, कृष्णा नरके, आनंदा शिंदे, गोवर्धन माने, सचिन भोसले, सुरेश चोपडे, प्रा. अनिरुद्ध मोरे, सतीश माने, जिनाप्पा पवार, अर्जुन पाटील, सुनील पाटील, पांडुरंग बीडकर, सौ. रसिका कोकाटे, सौ. आलका बाबर, सौ. काळे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे आभार रामचंद्र मोहिते यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा