जुने दानवाडला क्रीडांगणासाठी ४८ गुंठे जागा मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या युवकांना योग्य सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. याच अनुषंगाने जुने दानवाड येथील क्रीडाप्रेमी तरुणांसाठी ४८ गुंठे जागा क्रीडांगणासाठी मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.

जयसिंगपूर येथे दानवाड ग्रामस्थांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडांगण मंजुरी आदेशाची प्रत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांनी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये यश मिळवत तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्वल केले आहे. या तरुणांना हक्काचे क्रीडांगण मिळावे म्हणून प्रयत्न करून ४८ गुंठे जमीन क्रीडांगणासाठी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात येथे उत्तम दर्जाचे खेळाडू तयार होतील आणि तालुक्याचा नावलौकिक वाढेल. राज्य सरकारच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यासाठी विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षणासह विविध विकासकामे सुरू आहेत. यासोबतच क्रीडा क्षेत्रालाही चालना देण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत.

जयसिंगपूर येथे आधुनिक दसरा स्टेडिअमची उभारणी, ओपन जिमची स्थापना, व्यायामशाळांसाठी नवीन इमारती आणि आता जुने दानवाड येथे मंजूर झालेल्या क्रीडांगणाच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना उत्तम सुविधा मिळतील. खेळाडूंना व्यायामासाठी उत्तम वातावरण मिळाल्यास त्यांचे शरीर तंदुरुस्त राहील आणि ते स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करू शकतील.

क्रीडांगणामुळे जुने दानवाड आणि परिसरातील युवकांना दर्जेदार सराव करता येणार असून, त्यांच्यातील नैपुण्याला चालना मिळेल. ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा कौशल्य आहे, मात्र त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने अनेक जण मोठ्या संधींपासून वंचित राहतात. आता मिळालेल्या जागेमुळे खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि सरावाची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच श्रीमती राजश्री तासगावे, उपसरपंच बंडू अंबुपे, ग्रामपंचायत सदस्य आदगोंडा पाटील, महावीर पाटील, मल्लिनाथ पाटील, बापूसो बेडकिहाळे, महावीर चौगुले, आनंद पाटील, अमोल पाटील, प्रकाश मलिकवाडे, भरमू गुरव, रवींद्र पाटील, शीतल पाटील, प्रवीण वडगावे, संजय तिपण्णानावर, शिवराज तासगावे, पी. बी. पाटील, अमेय मलिकवाडे, दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष