आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिरोळच्या सौ संगीता माने यांना आदर्श वहिनीसाहेब पुरस्कार प्रदान
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे तुमच्यातीलच एक आहेत. आई-वडिलांनी जन्म दिला आहे. आम्ही आभाळातून पडलो नाही. काही लोकांना आमच्याविषयी तिरस्कार वाटतो. आमचा देव चालतो. भंडारा चालतो ,पण आम्ही चालत नाही. आशीर्वाद देऊन आता आमचे हात थकले आहेत.
समाजाने दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. असे मत सामाजिक कार्यकर्त्या मनिषा पुणेकर यांनी व्यक्त केले.
जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे अखिल भारतीय मूकनायक चित्रपट संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन व संघटनेचा ४ था वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्त्या व विशेष कार्यकारी अधिकारी संगीता दगडू माने यांना 'आदर्श वहिनीसाहेब ' पुरस्काराने सन्मान करण्यात आला . त्याचबरोबर विविध क्षेत्रातील अन्य आदर्शवत, कर्तुत्वान व्यक्तींनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रारंभी युवा लोकशाहीर अमोल बुचडे यांनी लोकप्रबोधनपर गाणी सादर करून सामाजिक एकतेचा संदेश दिला. डॉ. मिनाक्षी गणेश वाईकर यांनी स्वागत केले. राजेंद्र प्रधान यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्रसिद्ध करियर कौन्सिलर प्रा तोहिद मुजावर यांनी स्पर्धेच्या युगात आव्हाने स्वीकारून तरुणांनी करियर निर्माण करण्याची गरज आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुरू असलेले गोंधळाचे वातावरण समाजाला हितावह नाही. त्यामुळे मतभेद विसरून सर्वांनी एकसंघ राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या समारंभास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, कार्यक्रमाचे संयोजक प्रमुख डॉ. गणेश वाईकर , डॉ. ज्योत्स्ना संतोष कदम , मनोहर पवार , डॉ.प्रा. संतोष कदम , डॉ. दगडू माने यांची भाषणे झाली. सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट व मूकनायक चित्रपट संघटनेचे पदाधिकारी, कलाकार व नागरिक उपस्थित होते. रेखा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.आभार वासिम मोळे यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा