गणेशवाडी आणि खिद्रापूरला २ नव्या नौका : आमदार यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
गणेशवाडी आणि खिद्रापूर येथील नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित मागणी पूर्ण झाली असून, जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येकी १ अशा दोन नौका दिल्या आहेत. गणेशवाडी व खिद्रापूर या गावांना नौका मिळावी अशी मागणी ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षापासून होती, यासाठी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हा परिषदेकडे शिफारस केली होती, त्यानुसार या दोन गावांना नौका मिळाली असून लवकरच या नौकांचे पूजन करण्यात येणार आहे.
गणेशवाडी आणि खिद्रापूर ही गावे कृष्णा नदीच्या किनारी वसलेली आहेत. या गावांतील नागरिकांना नेहमीच नदी पार करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असे. विशेषत शेतकरी आणि रोजंदारी करणाऱ्या कामगारांना नदी पार करून दुसऱ्या गावांमध्ये जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे. या ठिकाणी कायमस्वरूपी पूल नसल्यामुळे नौका हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे आता नव्याने उपलब्ध झालेल्या चार नौकांमुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. शिरोळ तालुक्यात महापुराचा मोठा फटका बसतो. कृष्णा नदीला पूर आल्यावर अनेक गावांचा संपर्क तुटतो आणि नागरिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत नौका (होडी) हा एक महत्त्वाचा पर्याय ठरतो. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना स्थलांतरित करणे, अन्न-धान्य आणि वैद्यकीय मदत पुरवणे यासाठी या नौका उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गणेशवाडी आणि खिद्रापूर येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून या भागात नौका उपलब्ध करून देण्याची मागणी करत होते. ही गरज लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिफारस केल्यामुळे जिल्हा परिषद कोल्हापूरने दोन गावांसाठी नौका दिल्या आहेत.
या नौकांमुळे आता सहजपणे नदी पार करून दैनंदिन कामे करणे शक्य होईल. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आणि ग्रामस्थांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा