श्रमदान’ आणि ‘अपनापन’ उपक्रम – ग्रामीण विणकर व कैद्यांसाठी आशेचा किरण

सांगलीत रविवारी 'श्रमदान अपनापन स्टोअर'चा शुभारंभ


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

समाजसेवा आणि आत्मनिर्भरतेचा उत्तम संगम म्हणजे ‘श्रमदान’ आणि ‘अपनापन’ हे उपक्रम. या ब्रँड्सच्या माध्यमातून हजारो ग्रामीण विणकर आणि शेकडो कैद्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. हातमाग आणि हस्तकलेच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात असून, उच्च गुणवत्तेचे, अहिंसक आणि शुद्ध कापसाचे वस्त्र उत्पादन हा याचा मुख्य उद्देश आहे.

आचार्य श्री विद्यासागर आणि आचार्य श्री समयसागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालवला जाणारा हा अनोखा प्रकल्प ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवून तेथील नागरिकांना संस्कारित, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्याचे कार्य करतो. आधुनिक युगात अनेक पारंपरिक कौशल्ये लोप पावत आहेत, अशा वेळी ‘श्रमदान’ आणि ‘अपनापन’ या ब्रँड्सच्या माध्यमातून पारंपरिक हातमाग आणि हस्तकलेला नवसंजीवनी मिळाली आहे.

हा उपक्रम मुख्यतः मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये सक्रिय आहे. मध्यप्रदेशातील सागर, जबलपूर, डिंडोरी, मंडला, टीकमगड, अशोकनगर आणि दमोह जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण विणकरांना हातमागाच्या कामाचे प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि शिरडी शहापूर येथे, कर्नाटकमध्ये जुगुल येथे आणि राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातही हा उपक्रम कार्यरत आहे.

या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कारागृहातील कैद्यांना रोजगार उपलब्ध करून देणे. सागर, आग्रा, मथुरा, मिर्झापूर, बनारस आणि तिहार (दिल्ली) या सहा मोठ्या कारागृहांमध्ये कैद्यांना हातमागावर वस्त्रनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये टॉवेल, कुर्ता, हात रुमाल, साडी आदी वस्तूंचे उत्पादन केले जाते.

या संपूर्ण उपक्रमाचे संचालन साधारणतः ३० ब्रह्मचारी भाई आणि संन्यासी करतात. त्यांचे मुख्य कार्यालय मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील शहापुरा (भिटोनी) येथे स्थित आहे. समर्पणभावनेने हे ब्रह्मचारी आणि संन्यासी कार्यरत असून, समाजात आत्मनिर्भरतेची चळवळ निर्माण करत आहेत.

‘श्रमदान’ आणि ‘अपनापन’ केवळ ब्रँड नसून, ते समाजसेवेचा एक भाग आहेत. पारंपरिक कौशल्ये जपत ग्रामीण विणकारांना रोजगार, स्वाभिमान आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचप्रमाणे, जीवनात चुकलेल्यांना नव्याने उभे राहण्याची संधी देणारा हा प्रकल्प समाजासाठी एक आदर्श ठरत आहे. अशाच उपक्रमाच्या ‘श्रमदान’ आणि ‘अपनापन’ स्टोअरचा शुभारंभ रविवार दि. ३० रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सांगलीतील राजमाता चौक येथे करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष