कुटवाड येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि जगद्गुरू श्री तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुटवाड ता.शिरोळ येथे भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीचा अद्भुत संगम घडवत अखंड हरिनाम सप्ताह आणि जगद्गुरू श्री तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या 375 व्या बीज उत्सवानिमित्त 16 मार्च ते 22 मार्चपर्यंत सोहळा संपन्न होणार असून, संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे.
वारकरी संप्रदायाची परंपरा, संत वाङ्मयाचा प्रचार व प्रसार, तसेच भाविकांना अध्यात्मिक भक्तिरसाचा आनंद देण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन केले आहे. यामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या अभंग वाणीचा गोडवा, अखंड नामस्मरण, भजन-कीर्तन, गाथा पारायण, प्रवचने आणि विविध धार्मिक विधींचा समावेश आहे.
या सोहळ्यात ह.भ.प. रविंद्र साबळे महाराज (आळंदी), ह.भ.प. विजय पाटील महाराज (कुटवड), ह.भ.प. परशराम पाटील महाराज (कुटवाड) यांच्या प्रमुख उपस्थितीत तुकाराम गाथा पारायण होणार आहे.
या सोहळ्याला दररोज पहाटेच्या काकड आरतीपासून प्रारंभ होणार आहे. हरिपाठ आणि पारंपरिक भजन-कीर्तन,संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे सामूहिक वाचन व पारायण, विद्वान वारकरी आणि संत महंतांचे प्रवचने व आध्यात्मिक मार्गदर्शन,संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या अभंगांचा गजर आणि कीर्तनसेवा, टाळ-मृदंगाच्या गजरात नामस्मरण आशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी गजबजणार आहे.
22 मार्चला सप्ताह समारोपाच्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार हा सोहळा टाळ-मृदंगाच्या गजरात,हजारो भाविक विठूनामाचा जयघोष करत, पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन गावातून पारंपरिक दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून भक्तिरसाची अनुभूती देण्याचा संकल्प आयोजक मंडळाने केला असून दिंडीच्या समारोपानंतरबमहाप्रसाद आणि अन्नदानाचा कार्यक्रमाने पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.वारकरी संप्रदायाच्या विविध मंडळांच्या आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, संत तुकाराम महाराजांच्या वाणीचा गोडवा अनुभवण्याची सुवर्णसंधी आहे. भाविकांनी या अनोख्या अध्यात्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मंडळांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा