हेरवाड येथील कुमार विद्या मंदिर शाळेत चिमुकल्यांचा रंगतदार बाजार
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील कुमार विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला. व्यवहारज्ञान आणि उद्योजकतेचे महत्त्व समजावे यासाठी १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी शालेय आवारात छोटासा बाजार भरवला. या बाजारात विद्यार्थ्यांनी भाज्या, फळे, गृहपयोगी वस्तू, तसेच पाककलेचे विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार, खरेदी-विक्री, ग्राहकांशी संवाद, नफ्या-तोट्याचे गणित आणि स्वावलंबनाचे मूल्यमापन करता आले. चिमुकल्यांनी ग्राहकांच्या भूमिकेत शिक्षक, पालक आणि मित्रांना सहभागी करून घेतले.
शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूलभूत व्यवहार, दर ठरवण्याची पद्धत, सुट्टी देण्याचे तंत्र आणि वस्तूंची गुणवत्ता जपण्याचे महत्त्व शिकवले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, निर्णयक्षमता आणि उद्योजकतेची आवड निर्माण झाली.
बाजाराच्या आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कल्पकता पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले.
या बाजारात विविध प्रकारच्या भाज्या, फळांचे रस, फराळाचे पदार्थ, बेकरी उत्पादने, तसेच हस्तकलेच्या वस्तूही विक्रीसाठी ठेवल्या होत्या. पालक आणि ग्रामस्थांनी देखील मोठ्या संख्येने बाजाराला भेट दिली आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच जीवनोपयोगी कौशल्ये शिकवणारा ठरला, असे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा