ग्राहकांच्या शोषणमुक्तीसाठीच २०१९ चा ग्राहक संरक्षण कायदा : डॉ. कुमार पाटील
हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
ग्राहक हा केंद्रबिंदू मानून ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना केली व त्याद्वारे ग्राहकांच्या न्यायासाठी, हक्कासाठी 1986 चा ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करून घेतला पण कालमानानुसार त्यामध्ये बदल होऊन ग्राहकांचे ऑनलाईन व इतर मार्गाने शोषण होऊ लागले. त्यामुळे सुधारित ग्राहक संरक्षण कायदा 2019 अमलात आणला. या कायद्यान्वये ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, वस्तू निवडण्याचा हक्क, माहिती मिळवण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क व आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क हे अधिकार बहाल केले असून ग्राहकाने त्याचा योग्य वापर करून शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी सजग राहावे असे विचार अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरोळ तालुक्याचे मार्गदर्शक व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील यांनी व्यक्त केले. ते 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालय शिरोळ व पुरवठा विभाग यांच्यामार्फत पद्माराजे महाविद्यालय शिरोळ येथे आयोजित जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. डॉ. कुमार पाटील पुढे बोलताना म्हणाले विद्यार्थी व ग्राहक पंचायत पदाधिकाऱ्यांनी "2019 चा ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहकांचे अधिकार" याविषयी जाणून घेऊन ग्राहकांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा. यावेळी व्यासपीठावर शिरोळ तहसील कार्यालयातील अधिकारी सौ माने मॅडम,अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष श्री राजेश शंभूशेटे , ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष श्री बी जे पाटील, तालुकाध्यक्ष श्री बागवान , ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व पत्रकार श्री रमेश मिठारे , प्रवासी संघटनेचे पदाधिकारी श्री शिवगोंडा पाटील यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या उपाध्यक्षा सौ वर्षा पाटील, संघटक सुशांत भंडे व पुरवठा विभागाचे अधिकारी श्री पाडळकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी, स्वामी विवेकानंद, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. स्वागत व प्रास्ताविक अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष श्री राजेश शंभूशेटे यांनी केले व 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री बी जे पाटील यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना व पदाधिकाऱ्यांना उद्बोधक मार्गदर्शन करून ग्राहकांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी श्री पाडळकर यांच्या नेतृत्वाखालील कर्मचारी यांनी व पद्माराजे महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन युवक युवती व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा