कुरुंदवाड आठवडी बाजारात पुन्हा गोंधळाचे वातावरण

 



कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

       कुरुंदवाड येथील आठवडी बाजारात चौ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्त्यावर ठाण मांडून बाजार भरवल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नियमांचे पालन करण्यास सांगितले असता व्यापाऱ्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाजारपेठेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

    याची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अधीक्षक श्रद्धा वळवडे-मगदूम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बाजार सुरळीत करण्यासाठी व्यापाऱ्यांना पाच मिनिटांचा अल्टीमेटम दिला. नागरिकांना कुठलाही अडथळा होईल असे कृत्य त्वरित थांबवावे,अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या कडक भूमिकेमुळे व्यापाऱ्यांनी जागेवरच बाजार हलवून पालिकेने दिलेल्या जागेत व्यवसाय सुरू केला. त्यामुळे बाजार सुरळीत सुरू झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

      पालिकेच्या अधीक्षकांनी व्यापाऱ्यांना स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, पुढील आठवड्याच्या बाजारात जर पुन्हा अशा प्रकारचा गोंधळ झाला, तर संबंधित व्यापाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. व्यापाऱ्यांनी पालिकेच्या नियमानुसारच बाजार भरवावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

     पालिकेच्या या वेगवान आणि ठोस भूमिकेमुळे बाजारात शिस्त राखली गेली असून, नागरिक आणि इतर व्यापारी वर्गाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. भविष्यात अशा अडचणी टाळण्यासाठी नगरपालिका योग्य नियोजन करत असल्याच्या नागरिकांमधून भावना व्यक्त होत आहेत.

बाजाराची शिस्त बिघडू देणार नाही: मुख्याधिकारी गवळी

    पुढच्या आठवड्यात जुन्या भाजी मंडईतील पालिका फेडरल बँक प्रवेशद्वार ते राम सोसायटी पर्यंतच्या मधल्या मार्गावर ज्यादा येणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा करून देऊन सर्व भाजीपाला विक्रेत्यांची व व्यापाऱ्यांची सोया करणार आहे जेणेकरून कोणालाही रस्त्यावर बाजार मांडून शिस्त बिघडू नये यासाठी प्रयत्न करणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष