स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी शिरोळच्या जनतेची दिशाभूल : अर्जुन काळे, प्रवीण माने
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
नगरपरिषदेमध्ये ५ वर्ष सत्तेचा फायदा करून घेण्याच्या नादात आपण विरोधात निवडून आल्याचा विसर या गटाला पडला पण निवडणुकीला लोकांना काय सांगायचं मताचा जोगवा कशाच्या आधारे मागायचा हे लक्षात आल्यावर मग त्यांना ५ वर्ष नगरपरिषदेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार झाला आहे. विकास आराखड्यात राजकारण करण्याचा यांचा डाव फसल्यावर मग यांना लोकांना पाणी मिळत नाही हे आठवले. असा आरोप माजी सरपंच अर्जुन काळे व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण माने यांनी केला आहे.
यावेळी बोलताना अर्जुन काळे व प्रवीण माने म्हणाले की मुळात गेल्या ४० वर्षात गावात ३० वर्ष आंदोलन करणाऱ्यांची सत्ता असताना त्यांनी कधीही गावाची काळजी केली नाही. तर आपलं घर कसं भरेल हेच पाहिलं. त्यांच्या कर्तृत्वाचा परिणाम म्हणजे दोन नद्या असताना गावाला पुरेसं पाणी सुद्धा देता आलं नाही. आणि आता निवडणूक समोर आल्यावर हे गावाला पाणी का मिळत नाही म्हणत आहेत २००६ ला यांनीच राजकारण करून पाणी योजनेची वाट लावली त्यामुळेच गेल्या १५ वर्षात लोकांना पाणी पाणी करायची वेळ आली. हे त्यांनी विसरलं असलं तरी जनता विसरलेली नाही. नगरपरिषदेमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून आता हे चौकात भजन करून सांगत आहेत. हेही हास्यास्पद आहे. कारण भ्रष्टाचार हा चौकात होत नसतो तर तो नगरपरिषद सभागृहात होत असतो आणि तिथे तर यांचे ८ नगरसेवक होते एक नगरसेवक तर यांच्या घरातीलच होता.भ्रष्टाचार होत असताना त्यावेळी हे नगरसेवक काय करत होते? भ्रष्टाचार होत होता त्यावेळी का चौकात येऊन गावाला सांगितला नाही?
मुळात भ्रष्टाचार झाला हे म्हणायचा पण यांना अधिकार नाही कारण यांच्या सत्तेच्या काळात दररोज भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे घेऊन उपोषण आंदोलन होत असलेली गाचाने पाहिली आहेत. त्याच्या सुरस कहाण्या लोकांनी ऐकल्या आहेत. गेल्या १५ दिवसापासून सवडी शास्त्रानुसार चौकात जे धरणे आंदोलन सुरु आहे, त्या आंदोलनाची मागणी काय आहे. हेच प्रशासनासह कोणालाच माहित नाही. ठोस मागणी नसल्यामुळे लोकं पण या आंदोलनापासून अलिप्त आहेत. यांचा पिंड आंदोलनाचा नसल्याने यांच्याकडे संयम नाही. निव्वळ राजकीय हेतू ठेऊन आणि बदनामी करायच्या उद्देशाने आंदोलन तर चालू ठेवायचे या उद्देशाने मग आंदोलनाच्या नावाखाली तमाशा केला जात आहे.
पण यातून आंदोलन बदनाम होतंय याची यांना जाणीव नाही. असी निवडणूक होईपर्यंत यांचा समोरून भजन आणि आतून राजकारणाचा तमाशा सुरु राहणार आहे. असेही शेवटी अर्जुन काळे आणि प्रवीण माने यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा