म्हैशाळ ब्यारेज भविष्यात वादाचे कारण ठरणार : धनाजी चुडमुंगे
कनवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कनवाड म्हैशाळ दरम्यान दीड टी एम सी चे ब्यारेज उभारण्याचे काम सुरु आहे. हे ब्यारेज भविष्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी वाद निर्माण करण्याचे कारण ठरणार असून या ब्यारेज ला कनवाड मधील शेतकऱ्यांनी विरोध करावा असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी काल कनवाड येथील पूरग्रस्तांच्या बैठकीत केले.
आलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध म्हणून नागरिकांच्या हरकती दाखल करून घेण्यासाठी काल आंदोलन अंकुश चे कार्यकर्ते कनवाड मध्ये आले होते. दर्गा चौकात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य राजू बुरान होते. या बैठकीत बोलताना धनाजी चुडमुंगे पुढे म्हणाले की कनवाड म्हैशाळ दरम्यान जो सध्याचा बंधारा आहे त्याचे मजबुतीकरण करून म्हैशाळ योजना वर्षभर चालते पण टक्केवारी साठी आणि आपले दुष्काळी भागातील कारखाने चालावेत म्हणून माजी पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी हे महापुराचा आणखी धोका वाढवणारे ब्यारेज बांधण्याचे काम मंजूर केले आहे या ब्यारेज मुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी या ब्यारेज च्या पुढील भागात असणाऱ्या लोकांना आंदोलनाची वेळ येणार आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थिती आल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात याच्या पाण्यासाठी वाद होणार आहे. म्हैशाळ योजना वर्षभर चालवून त्यांनी पाणी वापरावे त्याला विरोध असण्याचे कारण नाही पण नदीत मोठा अडथळा निर्माण करून महापुराची भीषणता वाढवणाऱ्या या ब्यारेज ला कनवाड सह सर्व गावांनी विरोध करण्याची आवश्यकता असल्याचे शेवटी त्यांनी नमूद केले.
आंदोलन अंकुश चे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील यांनी मोठया प्रमाणात हरकती दाखल करून आलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध करण्याची सर्व नागरिकांना विनंती केली.
दस्तगीर पाशा इनामदार यांनी स्वागत केले तर मुसा साहेब इनामदार यांनी आभार मानले यावेळी आंदोलन अंकुश चे कामिल बाबा इनामदार सद्दाम बारगीर प्यारेलाल पटेल राजू हिंगमिरे निलेश कोकणे सिद्धार्थ चौगुले पोपट सुतार व नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा