खणदाळच्या नामदेव चिरमुरे यांची दुग्ध संस्थेच्या चेअरमनपदी निवड
सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :
गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ गावच्या एका सामान्य कुटुंबातील तरुणानं आपल्या जिद्दी आणि चिकाटीच्या बळावर असामान्य यश मिळवलं आहे. नामदेव मारुती चिरमुरे या दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणानं सेवा सोसायटीमध्ये शिपाई म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आता थेट श्री लक्ष्मी दूध संस्थेच्या चेअरमनपदापर्यंत मजल मारली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नामदेव यांनी सुरुवातीचे दहा वर्ष सेवा सोसायटीमध्ये शिपाई म्हणून काम केले. अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पण भावनेमुळे ते सर्वांचेच आवडते बनले.
त्यानंतर, 2023 मध्ये झालेल्या श्री लक्ष्मी दूध संस्थेच्या निवडणुकीत नामदेव यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्यावर गावकऱ्यांनी आणि संस्थेच्या सदस्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत, आता 2025 मध्ये त्यांची संस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली.
श्री लक्ष्मी दूध संस्था कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादनात एक अग्रेसर आणि प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या चेअरमनपदी एका सामान्य कार्यकर्त्याची निवड होणे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. नामदेव चिरमुरे यांच्या निवडीमुळे संस्थेच्या सभासदांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा