शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरेल : व्ही.एस.आय.चे शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांचे प्रतिपादन
शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :
पारंपरिक पद्धतीने शेती करून जमीन आणखी नापीक आणि क्षारपड बनत आहे. उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय कर्ब वाढ, जमिनीची सुपीकता, निरोगी बियाणे, हवामान बदलांचा अभ्यास, रोगांचे नियंत्रण, पाणी आणि खतांचा योग्य वापर करण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण या सर्व गोष्टी सुलभतेने व नेमकेपणाने करू शकतो. कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. शेतीला जपण्याबरोबरच अभ्यास वृत्तीने, आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी शेती करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन व्ही.एस.आय.चे प्रमुख शास्त्रज्ञ आणि पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख डॉ. ए. डी. कडलग यांनी केले.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व महाधन ॲग्रोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त मंदिर शेजारी आयोजित शेतकरी मेळावा व गळीत हंगाम 2024- 25 ऊस पिक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात 'पूर्व मशागतीचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक गणपतराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते.
गणपतराव पाटील म्हणाले, श्री दत्त साखर कारखान्याने सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच जमिनीला जपण्याची आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. चर्चासत्रे अशा मेळाव्यांच्या माध्यमातून होणाऱ्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी श्री दत्त कारखाना कटिबद्ध आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामान आधारित शेती या विषयावर मार्गदर्शन करून सन 2035 नंतर ज्यांच्याकडे शेती असेल तेच श्रीमंत असतील असे सांगितले. भविष्यात सेंद्रिय कर्ब वाढवणे आणि सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज ओळखून सर्वप्रथम मातीची काळजी घ्या, असे आवाहन केले.
कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयवंत जगताप यांचे 'सेंद्रिय कर्ब व त्याचे महत्त्व' या विषयावर, राहुरी महात्मा कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांचे 'सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान' या विषयावर, मृदाशास्त्र कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेषज्ञ डॉ. संतोष करंजे यांचे 'शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (ए. आय. तंत्रज्ञान' याविषयी आणि महाधन ॲग्रोटेक लिमिटेड पुण्याचे सीनियर जनरल मॅनेजर बिपीन चोरगे यांचे 'ऊस पिकातील रासायनिक खतांचा वापर' या विषयावर सखोल व्याख्यान झाले. प्रोजेक्टर द्वारे माहिती सांगून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ञांनी उत्तरेही दिली.
प्रारंभी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच गळीत हंगाम 2024- 25 ऊस पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. स्वागत कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांनी आभार मानले.
यावेळी माजी आमदार उल्हासदादा पाटील, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अनिलराव यादव, सर्व संचालक मंडळ, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा