दत्तवाड परिसराला गारपिटसह पावसाने झोडपले
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह बुधवारी सायंकाळी दत्तवाडसह काही भागांत उन्हाळी पावसाने हजेरी लावली. दत्तवाड गावात गारपीट झाली असून आसपासच्या काही गावात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने आंब्याच्या बागांनाही फटका बसला आहे. तर काही ठिकाणी झाडे उडमूळून पडण्याची शक्यता सुद्धा दिसून येत होती. दत्तवाड येथे बुधवारी दुपारी उन्हाच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागला. आज संध्याकाळ नंतर वारे सुरू झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त होते. संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त नागरिकांना पावसाने दिलासा दिला असला, तरी काही भागांत शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी व गुरुवारी सायंकाळी मेघगर्जनेसह मोठ्या पावसाचा अंदाज आहे.
काही ठिकाणी कडबा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने रात्रीचा उकाडाही वाढला आहे. बुधवार दत्तवाडचा आठवडी बाजार असल्यामुळे अचानक गारपिट वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे बाजारातील व्यापारांची तारांबळ उडाली होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा