महेश देवताळे यांची शिरोळ तालुका भाजप अध्यक्षपदी निवड
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
गणेशवाडी गावचे सुपुत्र महेश सदाशिव देवताळे यांची भारतीय जनता पार्टीच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व भाजप नेते माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली झाली. या निवडीसाठी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, माजी तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, महावीर तकडे,अबिद्दून मुजावर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निवडणूक प्रभारी सतिश पंडित यांच्या हस्ते देवताळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
महेश देवताळे यांचा राजकीय प्रवास शालेय जीवनापासूनच भाजपशी निष्ठावान राहिल्याचा साक्ष देतो. त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात गणेशवाडी गाव अध्यक्ष पदापासून केली आणि त्यानंतर भाजप युवा मोर्चा शिरोळ तालुका चिटणीस, दोन वेळा तालुका सरचिटणीसपद भूषवले. तसेच हातकणंगले लोकसभा व शिरोळ विधानसभा विस्तारक म्हणून आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत अल्पकालीन विस्तारक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
त्यांच्या कार्यतत्परतेची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला त्यांना खास निमंत्रण देण्यात आले होते.
राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही देवताळे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 2017 साली पंचायत समितीची निवडणूक लढवताना त्यांनी चांगली झुंज दिली. 2010 पासून गणेशवाडी ग्रामपंचायत पॅनेल प्रमुख म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे.
संजय गांधी निराधार योजना सदस्य म्हणून अनेक निराधार कुटुंबांना न्याय मिळवून दिला असून, महापूर काळात पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीचे त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. कन्यागत महापर्व काळ सोहळ्यात पश्चिम वाहिनी कृष्णा काठावरील गावांसाठी निधी मिळवून देण्यासही त्यांनी पुढाकार घेतला.
महेश देवताळे यांच्या या निवडीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा