शिरोळ तालुक्यात वळीव पावसाची हजेरी; उष्णतेने हैराण झालेले नागरिक सुखावले
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
मार्च महिना संपून एप्रिलही अखेरीस आला तरी शिरोळ तालुक्यात कुठेही वळीव पावसाची चिन्हे नव्हती. सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले होते, तर शेती पाण्याअभावी कोमेजू लागल्याने शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत होता. पिकांची वाढ खुंटल्याने यावर्षी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. आज मंगळवारी रात्री शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात वळीव पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पडलेल्या या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पाऊस कमी वेळासाठी असला तरी त्याचा शेतीला आणि जमिनीच्या तापलेल्या हवामानावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी हा पाऊस नैसर्गिक आधार ठरला असून, पिकांची वाढ सुरळीत होण्यास मदत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. काही भागांत जोरदार वाऱ्यामुळे किरकोळ नुकसान झाले असले तरी पावसाच्या आगमनाने समाधान व्यक्त केले जात आहे.
आगामी दिवसांतही अशाच प्रकारच्या वळीव पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक शेतीचे नियोजन करावे, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा