खणदाळच्या सरपंचपदी अश्विनी पाटील यांची बहुमताने निवड
सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :
खणदाळ (ता. गडहिंग्लज): खणदाळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. मंडल अधिकारी प्रवीण कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.
गावात सरपंच निवडीची प्रक्रिया अत्यंत शांततेत व सुरळीत पार पडावी म्हणून निवडीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावाचे पोलीस पाटील श्री. जोतीबा परीट, तलाठी कांबळे, ग्रामसेवक कुंभार, शासकीय कर्मचारी व शिवार वार्ताचे पत्रकार सुनिल दावणे हे उपस्थित होते.
माजी सरपंच रवींद्र यरकदावर यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. रिक्त पदासाठी अश्विनी पाटील आणि राजेंद्र जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतदान प्रक्रिया ‘हात उंचावून’ पद्धतीने पार पडली.
यामध्ये अश्विनी पाटील यांना ६ मते मिळाली, तर राजेंद्र जाधव यांना ४ मते मिळाली. महादेवी कळसाणावर या एकमेव सदस्या अनुपस्थित असल्यामुळे ११ पैकी १० सदस्यांच्या उपस्थितीत निवड पूर्ण झाली. बहुमताने विजयी होत अश्विनी पाटील यांची सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली.
ग्रामस्थांनी गुलालाची उधळण केली, फटाके फोडले आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. नवनिर्वाचित सरपंच अश्विनी पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. त्यांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण या प्राथमिक सुविधांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
गावातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग व युवा पिढीने त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अश्विनी पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी शशिकांत पाटील, इराप्पा हसुरी, दुंडाप्पा गुडशी, आप्पासाहेब पाटील, रमेश पाटील, मल्लाप्पा मुदपाकी, शंकर यरकदावर, अजित मनवाडे, अजित चिनगुडे, महादेव कळसाणावर, तमन्ना कडलगे, संजय घोडके, शंकर कोणूरी, लक्ष्मण सूर्यवंशी, बाळू कोणूरी, आप्पासो गुडशी, मलगोंडा पाटील, बसवानी पाटील, राजू मगदूम, अनिल मोकाशी व बसवराज सुतार उपस्थित होते. माजी सरपंच रवींद्र यरकदावर यांनी आपल्या कार्यकाळातील सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा