राष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकवणाऱ्या निशिगंधाचे हेरवाडमध्ये जल्लोषी स्वागत
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
मणिपूर येथे झालेल्या नॅशनल स्कूल गेम्स चॅम्पियनशीप २०२४-२५ अंतर्गत वेटलिफ्टिंग (१७ वर्षांखालील मुलींचा गट) स्पर्धेत हेरवाड (ता. शिरोळ) येथील कु. निशिगंधा सुरेश कडोले हिने देशात प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राचे आणि गावाचे नाव संपूर्ण देशभरात उज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, गावकऱ्यांच्या वतीने तिचा जल्लोषात सत्कार करण्यात आला.
निशिगंधाने आपल्या अत्यंत परिश्रमाने आणि सातत्यपूर्ण सरावाने हे यश संपादन केले आहे. तिच्या कामगिरीने हेरवाड गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, असे गौरवोद्गार प्रदिप पाटील यांनी सत्कार समारंभात बोलताना काढले. या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन हेरवाड गावच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी वेटलिफ्टिंग खेळाडू तेजस जोंधळे, भूमिका मोहिते यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
गावात तिच्या गौरवासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली. निशिगंधाची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. शाळकरी विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या यशामध्ये तिच्या प्रशिक्षकांचा, शिक्षकांचा आणि पालकांचा मोलाचा वाटा असून, सर्वांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निशिगंधाने आपल्या यशानंतर बोलताना सांगितले की, “हे यश मी माझ्या आई-वडिलांना, प्रशिक्षकांना आणि शाळेला समर्पित करते. भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवण्याचे माझे स्वप्न असल्याचे सांगितले.
हेरवाड गावातील विद्यार्थ्यांसाठी निशिगंधा एक प्रेरणास्त्रोत ठरली आहे. तिच्या यशामुळे गावातील मुला-मुलींमध्ये क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची उमेद निर्माण झाली आहे.
सत्कार सोहळ्यात सरपंच रेखा जाधव, सुभेदार चंद्रकांत माळी, प्रशिक्षक विजय टारे, श्रद्धा पवार, डॉ. रविंद्र चव्हाण, उपसरपंच भरत पवार, दिलीप पाटील, माजी सरपंच सुरगोंडा पाटील, वसंतराव देसाई, सुवर्णा अपराज, मिनाज जमादार, राजू आवळे, उपाध्ये पंडित, प्रफुल्ल पाटील, ॲड. अनिरुद्ध कांबळे, बंडू पाटील, चेअरमन वैभव पाटील, अनिल अकिवाटे, तलाठी संतोष उपाध्ये, ग्रामपंयायत अधिकारी पी. आर. कोळेकर यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावातील विविध विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संचालक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत बाबासाहेब नदाफ तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी माने यांनी केले. आभार सरपंच रेखा जाधव यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा