जयसिंगपूर शहरात ए.बी. केबल टाकण्याचे काम सुरू
धोकादायक विद्युत वाहिन्यांपासून दिलासा
संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शुभारंभ
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर शहरातील जुन्या आणि धोकादायक विद्युत वाहिन्या हटवून त्यांच्या जागी ए.बी. (एरियल बंच) केबल बसवण्याच्या कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. महावितरणच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत हे काम राबवण्यात येत असून यामुळे झोपडपट्टी व दाट लोकवस्ती असलेल्या भागातील नागरिकांना दीर्घकाळ त्रासदायक ठरत असलेल्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांपासून कायमचा दिलासा मिळणार आहे.
जयसिंगपूरमधील बावन्न झोपडपट्टी, राजीव गांधी नगर, मच्छी मार्केट, तसेच शहरातील अन्य भागांमध्ये वर्षानुवर्षे विद्युत वाहिन्या झुकलेल्या, खांब खराब झालेले आणि तारा खाली आल्यामुळे सतत विद्युत तारेचा धोका निर्माण होत होता. विशेषतः पावसाळ्यात ही स्थिती अधिकच भयावह होत होती. या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने आरडीएसएस योजनेतून ए.बी. केबल टाकण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष शिफारस केली होती.
ए.बी. केबल्स या संरक्षित केबल्स असून त्या एकत्रितपणे बसवण्यात येतात त्यामुळे त्यांच्यात शॉर्टसर्किट, स्पार्किंग किंवा तुटण्याचा धोका अत्यल्प असतो. हे काम पूर्ण झाल्यानंतर जयसिंगपूरमधील झोपडपट्टी आणि दाट वस्ती भागात वीज पुरवठा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहे.
या कार्यक्रमावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके, उपकार्यकारी अभियंता अभिजीत जाधव, सहायक अभियंता सम्राट पाटील यांच्यासह बद्री इलेक्ट्रिकल्स फार्मचे संदीप पाटील, गौतम पाटील, राहुल पाटील, गिरमल कोळी, अमर वसगडे, प्रवीण इंगळे, आप्पासो निशाण्णावर व अन्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा