टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला क्रीडांगण विकासासाठी ७ लाखांचा निधी मंजूर
सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क :
सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलसाठी सन २०२४-२५ या वर्षातील क्रीडांगण विकास अनुदान योजना (विशेष घटक योजना) अंतर्गत कंपाउंड वॉल बांधकामासाठी सात लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी भवानीसिंह घोरपडे यांनी विशेष प्रयत्न केले. संबंधित पत्र भवानीसिंह घोरपडे आणि शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले.
या प्रसंगी वैभव पाटील, बाळासाहेब गोते यांची उपस्थिती होती. राज्य शासनाच्या क्रीडा धोरण २०१२ अन्वये आणि त्यास अनुसरून करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील क्रीडा संस्कृतीच्या विकासासाठी ही योजना राबवली जाते. पात्र संस्थांना क्रीडांगणाच्या विकासासाठी अनुदान देण्यात येते.
शाळेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार मिळालेल्या या निधीमुळे शाळेच्या क्रीडांगणाचा विकास साधता येणार आहे. या कामी शाळेचे क्रीडाशिक्षक उदय पाटील, तालुका समन्वयक धनाजी गावडे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सचिव राजेश पाटील व संचालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा