हरवलेली तीन वर्षांची मुलगी नृसिंहवाडीत सापडली; पालकांच्या ताब्यात सुखरूप
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
देवदर्शनासाठी नृसिंहवाडी येथे आलेल्या कल्याण येथील मनोज मांजरेकर यांची तीन वर्षांची मुलगी नुविका प्रकाश मांजरेकर ही हरवल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. काही वेळाच्या शोधाशोधीनंतर ही मुलगी नृसिंहवाडी परिसरात सापडून तिला पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.
प्रकाश मनोहर मांजरेकर (वय ४५, व्यवसाय शिक्षक) आणि सौ. राजेश्वरी प्रकाश मांजरेकर (वय ३९) हे कुटुंबिय आपल्या मुलीसह नृसिंहवाडीत देवदर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर ते पुढे सिद्रापूर येथील गणपती मंदिरात गेले असता, मुलगी नुविका हरवली, त्यांनी तात्काळ परिसरात शोधाशोध सुरू केली.
या घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. बाबा पटेल, पो. हे. कॉ. हक्के, पो. कॉ. खराडे व पोलीस मित्र शरद दिलीप सुतार यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. त्याचबरोबर देवस्थानचे कर्मचारी अभिजित शिंदे यांनीही मदत केली. सामूहिक प्रयत्नांमुळे काही वेळातच हरवलेली मुलगी सापडली.
मुलगी नुविका ही पूर्णपणे सुरक्षित असून, तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रसंगी पोलिसांनी दाखवलेली तत्परता व दक्षता कौतुकास्पद ठरली. पालकांनी पोलिसांचे व देवस्थान कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा