मे महिन्यातच सिद्धनाळ बंधारा पाण्याखाली – निपाणी परिसरात अवकाळी पावसाचा मोठा फटका

साताप्पा कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

निपाणी शहर व परिसरात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, यामुळे परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सतत पडणाऱ्या या पावसामुळे सिद्धनाळ (ता. निपाणी) येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. परिणामी अकोळ, सिद्धनाळ, हुनरगी, बोळेवाडी या गावांचा एकमेकांशी तसेच निपाणी व कोल्हापूर-कागल मार्गाशी संपर्क तुटला आहे.

सिद्धनाळ बंधारा हा मार्ग कोल्हापूर, कागल, गोकुळशिरगाव एमआयडीसी या औद्योगिक भागांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या कामगार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, बंधारा जलमय झाल्याने या नागरिकांना आता पर्यायी मार्गाने – जत्राट व नागनूर मार्गे – मोठा फेरा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढल्याने कामगार वर्गात नाराजी पसरली आहे.

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने शेतीच्या कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. काही ठिकाणी व्यापारही ठप्प झाला असून, व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या परिस्थितीमुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाने तातडीने परिस्थितीकडे लक्ष देऊन बंधाऱ्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष