मे महिन्यातच राधानगरी धरण अर्धे भरले
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर शहर व जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. मे महिन्यातच नद्या भरभरून वाहू लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावर २० फूट ३ इंचांवर पोहोचली असून, पंचगंगा घाट परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. घाट परिसर जलमय झाल्याने नागरिक व भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात एकूण १३ बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे. दरम्यान, कोणत्याही धरणातून पाणी सोडण्यात आलेले नसतानाही नद्या भरून वाहू लागल्या आहेत, ही बाब अधिकच लक्षवेधी ठरते.
राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून जोरदार पावसाचा अनुभव येत असून, त्यामुळे धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या राधानगरी धरण मे महिन्यातच ५० टक्क्यांपर्यंत भरले आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास जून महिन्याच्या सुरुवातीलाच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्याच्या परिस्थितीमुळे प्रशासन सतर्क झाले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा