शिरोळमध्ये पशुगणना झाली पण आकडेवारी गायब ; प्रशासनाकडून स्पष्टता नाही
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यात तब्बल सहा वर्षांनंतर २०२५ मध्ये पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने युद्धपातळीवर पशुगणना करण्यात आली. मात्र, ही गणना झाली तरी खऱ्या अर्थाने तिची खात्रीशीर आकडेवारी अद्याप उपलब्ध नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
२०१९ नंतर प्रथमच ही गणना होत असून, शिरोळ सारख्या कृषीप्रधान भागात पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधार आहे. यामुळेच या गणनेचे विशेष महत्त्व आहे. या मोहिमेसाठी २१ जणांची विशेष टीम कार्यरत राहून, त्यांनी गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर, अशा सर्व पशुधनाची माहिती संकलित केली आहे.
२०१९ मधील पशुगणनेनुसार, तालुक्यात गाय – २७,८३२, म्हैस – ४८,१८६, शेळी – १२,२५९, मेंढी – ७,५९९ आणि डुक्कर – ११ इतके पशुधन होते. शिरोळ तालुका दुग्धव्यवसायात अग्रस्थानी असून, शेळी व मेंढीपालनही येथे मोठ्या प्रमाणात होते.
पशुगणनेवरून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सरकारकडून अनेक योजना आखल्या जातात. मात्र, यंदाच्या गणनेची आकडेवारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी देशमुख यांच्याकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सदरची आकडेवारी केंद्राला पाठवली असून आमच्याकडे ती उपलब्ध नाही,” असे त्यांनी सांगितले. ही बाब लक्षात घेता, तालुक्यात प्रत्यक्षात पशुगणना झाली की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे पारदर्शकता व माहिती उपलब्धतेबाबत प्रशासनाने उत्तरदायित्व स्वीकारावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा