गावाच्या विकासाची चळवळ बळकट करण्यासाठी उद्योगधंद्यांची गरज : माजी आम.आवाडे

  


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

       सूत व्यवसाय हा उद्योग नव्हे, तर तो शेतकऱ्यांना आधार देणारा, कापसाला बाजारभाव मिळवून देणारा आणि गावगाड्याला आर्थिक संजीवनी देणारा मूलभूत आधारस्तंभ आहे. या व्यवसायात संधी, विकास आणि भविष्यातील स्थैर्य आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन रामचंद्र डांगे यांनी सूतगिरणी उभी केली आहे. ही केवळ गिरणी नसून गावाला आत्मविश्वास देणारा उपक्रम आहे,” असे प्रतिपादन माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.

       येथील साधना मंडळाच्या सभागृहात नियोजित श्रीराम भटक्या विमुक्त जमाती सूत गिरणी मर्या.कुरुंदवाडच्या शेअर्स वितरण कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार आवाडे बोलत होते. माजी मंत्री आम. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, अशोकराव कोळेकर, दादासाहेब पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

      आम. डॉ. पाटील-यड्रावकर म्हणाले, श्रीराम सूतगिरणी हा प्रकल्प केवळ एक औद्योगिक यंत्रणा नसून, तो जनतेच्या सहभागातून उभी राहणारी एक चळवळ आहे. रामचंद्र डांगे यांनी ‘आपलं गाव स्वयंपूर्ण व्हावं’ या हेतूने ही गिरणी उभी केली आहे. त्यांच्या पारदर्शक आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळेच सामान्य शेअरधारकांनी विश्वासाने आपली गुंतवणूक केली आहे.डांगे यांनी राजकीय बदलांची पर्वा न करता राजकारणात कोणतीही उलथापालथ झाली, पक्ष बदलले, समीकरणं बदलली, सत्तेचे रंग पालटले तरी आमचा पाठिंबा रामचंद्र डांगे यांच्यासोबत होता, आहे आणि पुढेही राहील असे सांगितले.

      माजी खासदार श्रीमती निवेदिता माने म्हणाल्या, “गावाचा खरा विकास उद्योग उभा केल्याशिवाय शक्य नाही. ही गिरणी म्हणजे केवळ भिंती नाहीत, तर गावकऱ्यांचं स्वप्न, मेहनतीचं भांडवल आणि नेतृत्वावरचा विश्वास आहे. तरुण, महिला, आणि शेतकरी यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून डांगे यांनी हा उपक्रम उभारला असून, त्यात जनतेचा मोठा सहभाग मिळवणे हे त्यांच्या कार्यशैलीचं यश आहे.”

     यावेळी शेअर्स खरेदी केलेल्या सभासदांना अधिकृत पावत्या वितरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य भोजे यांनी केले. संस्थापक रामचंद्र डांगे, माजी नगराध्यक्ष पाटील भुजुगडे, प्रा. बी. डी. सावगावे आदींनी मनोगत व्यक्त केले.

     यावेळी धनपाल पोमाजे, विठोबा कोळेकर, बाबासाहेब सावगावे, तेजस कोळेकर, पोपट पुजारी, महिपती बाबर,तुकाराम चिगरे आदी उपस्थित होते. आभार रणजित डांगे यांनी मानले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष