अलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात उद्या कुरुंदवाड बंद

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरोळ तालुक्यातील पुरस्थितीत सर्वाधिक फटका बसणाऱ्या कुरुंदवाड शहराने अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंचीवाढीच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून कुरुंदवाड शहरातील सर्व दुकाने, व्यवसाय, हॉटेल्स व इतर व्यवहार दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन कुरुंदवाड व्यापारी महासंघ व सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीने केले आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास पुराचे प्रमाण अधिक भयावह होईल आणि दरवर्षी शहरासह परिसरातील गावांना मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागेल, अशी भीती व्यापारी व नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि आपला विरोध स्पष्ट करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात व्यापाऱ्यांसह नागरिकांनी देखील सहभाग घ्यावा, असे आवाहनही कृती समितीने केले असून शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्याच्या आंदोलनामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत होण्याची शक्यता असली तरी, जनतेच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी हे आंदोलन आवश्यक असल्याचे मत विविध व्यापारी संघटनांनी व्यक्त केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष