अलमट्टीबाबत लवकरच चार राज्यातील जलसंपदा मंत्र्यांची बैठक : केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील
खासदार धैर्यशील माने यांनी मांडली भूमिका

फोटो ओळी : दिल्ली : येथे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्यासोबत अलमट्टी धरणाबाबत विशेष बैठकीत चर्चा करून निवेदन देताना खासदार धैर्यशील माने.
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
अलमट्टी धरणा संदर्भात लवकरच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्याच्या जलसंपदामंत्र्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज येथे दिली.
दिल्ली येथे आयोजित बैठकीत बोलत होते.खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. अलमट्टी धरणाच्याबाबत केंद्रीय जल आयोगाने विहित केलेल्या हंगामी पाणी पातळी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून पावसाळ्यात पाण्याची पातळी कमाल मर्यादा ५१५ मीटर निश्चित करावी.तसेच दोन्ही राज्यांमध्ये वैज्ञानिक समन्वयासाठी संयुक्त पूर नियंत्रण प्राधिकरण स्थापन करून कृष्णा नदीच्या खोऱ्यात रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टम आणि पूर्वसूचना प्रणाली स्थापित करावी.या धरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा आणि सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीररित्या जबाबदार धरा, अशी मागणी जल शक्ति मंत्री सी.आर. पाटील यांचेकडे बैठकी दरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी केली.यावेळी मंत्री पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटल आहे,कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची आणि पाणी साठवण क्षमतेत केलेली बेकायदेशीर वाढ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारांमधील दीर्घकाळापासून वादाचा विषय आहे.ज्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा सारख्या नदीच्या भागात गंभीर पूर परिस्थिती निर्माण होऊन जिल्ह्यातील रहिवाशांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर थेट परिणाम होतो.व्यवस्थापन केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार धरणाची पूर्ण जलाशय पातळीला ५१९.६ मीटर आहे.धरणाची पाणी पातळी विहित उंचीनुसार राखण्यात कर्नाटक राज्य सरकारकडून वारंवार उल्लंघन करण्यात आले आहे,ज्यामुळे बॅकवॉटर इफेक्ट आणि गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे शेती आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शिवाय महाराष्ट्र सरकारने पूर अंदाज प्रणाली आणि गाळ काढून टाकण्यासाठी संयुक्त जबाबदारीची मागणी केली होती,परंतु आजपर्यंत कोणतीही संयुक्त यंत्रणा स्थापन केलेली नाही. वरील घटनांवरून स्पष्टपणे दिसून येते की अलमट्टी धरणाच्या गैरव्यवस्थापनामुळे सह्याद्री पर्वतरांगा आणि पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह दरवर्षी विस्कळीत होतो. वेळेवर पाण्याचा विसर्ग न झाल्यामुळे, कोल्हापूर आणि सांगलीतील नदीपात्र पाण्याखाली जातात, ज्यामुळे शेती, पायाभूत सुविधा आणि उपजीविकेचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होते.त्यामुळे तातडीच्या उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याची शिफारस यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी केली.बैठकीस खासदार शोभा बच्छाव, स्मिता वाघ, भाऊसाहेब वाकचौरे, पप्पू यादव आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा