टाकळीवाडीच्या सुपुत्रांची गगनभरारी ; तिघा सैनिकांना एकाचवेळी पदोन्नती
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
टाकळीवाडी गावातील तिघा सुपुत्रांना एकाचवेळी सैन्य दलात पदोन्नती मिळाल्याची गौरवशाली घटना घडली आहे. विजय श्रीपाल बदामे यांची सुभेदार मेजर, अमोल आप्पासो वनकोरे यांची नायब सुभेदार, तर अजय पारीसा काणे यांची सीआरपीएफ उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. या तिघांच्या यशामुळे टाकळीवाडी गावात आनंदाचे वातावरण आहे.
विजय बदामे यांनी भारतीय सैन्यात प्रदीर्घ सेवा करताना शौर्य आणि निष्ठेने कामगिरी बजावली असून, त्यांची सुभेदार मेजर पदावर नियुक्ती ही गावासाठी भूषणाची बाब आहे. अमोल वनकोरे यांची नायब सुभेदार पदावर पदोन्नतीही त्यांच्यातील कौशल्य आणि शिस्तीचे द्योतक ठरते. तर, अजय काणे यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये उपनिरीक्षक पदावर बढती मिळवून देशसेवेसाठी नवा टप्पा गाठला आहे.
या तीनही सैनिकांची पदोन्नती एकाचवेळी झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे. सैनिक वेल्फेअर असोसिएशन, टाकळीवाडी, तसेच सर्व ग्रामस्थ, आजी-माजी सैनिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. गावामधील तरुणाईसाठी हे एक प्रेरणादायी पाऊल असून, त्यांच्या यशामुळे अनेकांना सैन्यात भरती होण्यासाठी नवा आत्मविश्वास मिळणार आहे.
या तिघांचा सन्मान करण्यासाठी लवकरच विशेष स्वागत समारंभाचे आयोजन होणार असल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली आहे. टाकळीवाडीचे हे तिघे सुपुत्र गावाचे, तालुक्याचे आणि राज्याचे नाव उज्वल करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा