सैनिक टाकळीमध्ये मुसळधार पाऊस; झाडे उन्मळून पडली, पिकांचे नुकसान

 


सुदर्शन पाटील / शिवार न्यूज नेटवर्क :

सैनिक टाकळी परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जोरदार स्वरूप धारण केले. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ झाली आहे.

मे महिन्याच्या तीव्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. परिसरातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. काही रस्त्यांवर ही झाडे अडथळा ठरत असून, वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती.

या पावसामुळे आडसाली ऊस पिकासाठी चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, टोमॅटो, भाजीपाला व इतर नाजूक पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतांमध्ये पिकं सडू लागल्याचीही माहिती आहे.

सध्या वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना मागील काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उष्णतेपासून थोडा आराम मिळालेला आहे. तरीही, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे यावर्षीचा मे महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड मोडतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्थानिक प्रशासन आणि कृषी विभागाने झाडे पडण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून मदतीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष