मानसूनपूर्व पावसाने शिरोळ तालुक्यात हाहाकार ; नद्या तुडुंब, जनजीवन विस्कळीत

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 गेल्या दोन दिवसांपासून शिरोळ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे पंचगंगा, दूधगंगा, वारणा व कृष्णा या चारही नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. विशेषतः शिरोळ तालुक्याचा शेवटचा बंधारा असलेला राजापूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नदी पात्रातील जलपर्णीही मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने काही काळ का होईना नदी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र आहे.

या अचानक सुरु असलेल्या पावसामुळे शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात पेरणीपूर्व मशागतीचे काम सुरू असताना पावसाने खंड न घेता बरसल्यामुळे शेतातील कामे को खोळंबली आहेत. काही भागात आधीच पेरणी झालेली असून त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे उगवण होण्याआधीच पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून पुढील टप्प्यातील पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी घरामध्ये घुसल्याने घरगुती साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांचे कपडे, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि उपयोगी वस्तू पाण्यात भिजून खराब झाल्या आहेत. 

दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात पाण्याची टंचाई जाणवणारे चित्र असते. मात्र यावर्षी अचानक मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने नद्यांचे पात्र भरून वाहू लागले. त्यामुळे तलाव, बंधारे आणि विहिरी भरून निघाल्या आहेत. काही ठिकाणी, झाडे उन्मळून पडणे, वीज खंडित होणे अशीही संकटे निर्माण झाली आहेत.

 हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष