गुणात्मक शिक्षणासाठी विद्यासागर संस्था सदैव कटिबद्ध राहणार – अण्णासाहेब हवले
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
“शिका आणि कमवा” या प्रेरणेतून स्थापन झालेल्या सीमाभागातील विद्यासागर शिक्षण संस्थेने गेल्या दोन दशकांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ठोस वाटचाल केली आहे. संस्थेच्या माध्यमातून कन्नड कॉन्व्हेन्ट, कन्नड प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमाची एल.के.जी, यू.के.जी, हायस्कूल, आय.टी.आय कॉलेज तसेच नुकतेच मंजूर झालेले संजय कॉलेज ऑफ डी फार्मसी यांसारख्या विविध संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण व रोजगाराभिमुख शिक्षण देत आहेत.
यापुढेही गुणी विद्यार्थी घडविण्यासाठी संस्थेच्या वतीने आम्ही कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य आणि संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी केले. ते विद्यासागर शिक्षण संस्था, बोरगाव येथे आयोजित दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी आणि निवृत्त शिक्षिका सुरेखा पाटील यांच्या गौरव समारंभात बोलत होते.
सहकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही आमची कामगिरी अशीच पुढे जावी, या उद्देशाने श्री. अण्णासाहेब हवले यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात जिनवाणी अर्बन को-ऑप. सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सुनीता हवले म्हणाल्या की, “सुरेखा पाटील-खानवा यांनी गेल्या ३० वर्षांत समर्पित शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार रुजवण्याचे कार्य केले. अपंगत्वावर मात करत त्यांनी दाखवलेली निष्ठा, समर्पण आणि कर्तव्यपरायणता प्रेरणादायक आहे.”
सुरेखा पाटील या १९९५ साली बोरगाव येथील कन्नड प्राथमिक शाळेत रुजू झाल्या आणि त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या कार्याचा गौरव करताना गावकरी, पालक आणि विद्यार्थी भावुक झाले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीतांनी झाली. यावेळी कन्नड हायस्कूल, इंग्रजी माध्यम हायस्कूलमधील शिक्षक-शिक्षिका आणि सुरेखा पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
विशेष आकर्षण ठरली विद्यासागर शिक्षण संस्थेची माजी विद्यार्थिनी कुमारी रिया विद्याधर कमते, जिने नुकत्याच दहावीच्या परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक मिळविला. तिचा आणि तिच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी जि.प. सदस्य अण्णासाहेब हवले, सौ. सुनीता हवले, पंपा मैशाळे सर, बाळासाहेब बसंनावर, रावसाहेब तेर, भाऊसाहेब पाटील-खानबा, बाळासाहेब कमते, शिवाप्पा माळगे, मुख्याध्यापक एस.ए. कोळी, राजू खिचडे, अजित हवले, नेमिनाथ बारवाडे, ऐश्वर्या हवले, सलोनी हवले यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू खिचडे सर यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा