२ कोटींच्या निधीतून डौलाने उभी राहिली मुस्लिम सांस्कृतिक हॉलची इमारत
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला भरघोस निधी
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आणि मुस्लिम समाजासाठी एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र ठरणारी मुस्लिम सांस्कृतिक हॉलची इमारत अखेर उभारण्यात आली असून, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि पाठपुराव्यामुळे तब्बल २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि अवघ्या एका वर्षात ही आकर्षक व बहुपयोगी इमारत उभी राहिली असून या इमारतीमुळे कुरुंदवाड शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
या नव्याने उभारलेल्या शादीखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे ८ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात अत्यंत आधुनिक व सोयीस्कर पद्धतीने तयार करण्यात आलेले बांधकाम. या इमारतीमध्ये एक प्रशस्त व भव्य हॉल, किचन रूम, वधू-वरांसाठी स्वतंत्र खोल्या तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये अशा सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. ही इमारत केवळ विवाह सोहळ्यापुरती मर्यादित न राहता, समाजातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीसुद्धा ही इमारत उपयुक्त ठरणार आहे.
प्रथम टप्प्यात दीड कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून एकूण दोन कोटी रुपये खर्चून हे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. सार्वजनिक निधीचा अचूक व वेळेत उपयोग कसा करावा याचे हे एक उत्तम उदाहरण ठरते.
या आधी मुस्लिम समाजातील नागरिकांना विविध खासगी हॉलमध्ये विवाह समारंभ किंवा धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम भरवावे लागत होते. त्यामुळे अनेक वेळा त्यांना आर्थिक खर्चाचा मोठा बोजा सहन करावा लागत असे. मात्र आता मुस्लिम संस्कृतिक हॉलची इमारत उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान टळणार असून गरजेप्रमाणे वेळेनुसार उपयोगही अधिक सुलभ होणार आहे.
या इमारतीमुळे समाजातील लोकांना हक्काचे ठिकाण मिळाले असून, विवाह, नामकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, सभासद सभा इत्यादींसाठी वापर करता येणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ही सुविधा मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही इमारत पूर्ण झाल्यानंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा