"युवकांनी मादक पदार्थांपासून अलिप्त राहावे" – पी.एस.आय. शिवकुमार बिरादार यांचे प्रतिपादन
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
सध्याच्या धावपळीच्या युगात तरुणांनी आपले आयुष्य घडवताना शरीर आणि मनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र मोबाईलच्या आणि ग्लॅमरच्या दुनियेमुळे अनेक युवक-युवती मादक पदार्थांच्या आहारी जात असून, आपले उज्वल आयुष्य विनाशाच्या दिशेने नेत आहेत. त्यामुळे आई-वडील व शिक्षकांनी वेळेत मुलांना व्यसनमुक्तीचे भान देणे ही काळाची गरज आहे, असे मत सदलगा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी व्यक्त केले.
संजय कॉलेज ऑफ फार्मसी, बोरगाव यांच्या विद्यासागर शिक्षण संस्था अंतर्गत ‘जागतिक मादक पदार्थ विरोधी दिना’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संदीप मुर्तले होते. प्रारंभी मुख्याध्यापक राजू खिचडे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सदलगा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिकारी आनंद पांडव यांचा खास सत्कार करण्यात आला. त्यांना नुकताच फिनिक्स ग्लोबल संस्था मार्फत ‘आदर्श समाज रत्न’ हा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांची एएसआय (ASI) पदावर बढती झाल्याने संस्थेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
पीएसआय बिरादार पुढे म्हणाले, “सध्याच्या काळात अनेक तरुण-तरुणी गुटखा, तंबाखू, गांजा, अफू, दारू यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाऊन स्वतःचे जीवन उध्वस्त करत आहेत. तंबाखूसारख्या व्यसनामुळे कर्करोगासारख्या घातक आजारांचा सामना करावा लागत आहे. यासाठी समाजात सातत्याने प्रबोधनात्मक उपक्रम राबवणे अत्यावश्यक आहे.
विद्यासागर शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेमार्फत शैक्षणिक, क्रीडा, साहित्य व सामाजिक क्षेत्रात उपक्रम राबवले जात आहेत.
या कार्यक्रमाला बीडीआय कॉलेजचे उपप्राचार्य थोरात, प्रा. दर्शन पाटील, डॉ. विरकुमार गोरवाडे, हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.के. कोळी, प्रा. नदाफ, प्रीती मगदूम, प्राजक्ता खोत, श्रुती तहसीलदार यांच्यासह प्राथमिक, माध्यमिक, आयटीआय, बी.एड. व फार्मसी विभागातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. मनाली सर यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा