शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांचे हस्ते लाट हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, लार येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे जि.प. कोल्हापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांच्या हस्ते फुल व खाऊ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी श्री. जितेंद्र चौगुले देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक डॉ. देवेंद्र कांबळे यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. त्यांनी शाळेच्या प्राथमिक विभाग, माऊली बालवाडी, संगणक विभाग, विज्ञान प्रयोगशाळा, अद्ययावत गणित प्रयोगशाळा, अटल टिकरिंग लॅब आणि वर्गखोल्यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
नवागत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ. सावंत म्हणाल्या, “दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आदर्श समोर ठेवून जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर यश संपादन करा. आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी जबाबदारी आहे.” संस्थेतील एकोपा, शिक्षकांचा समन्वय, आणि शाळेचा सुंदर परिसर यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व संस्थेचे संचालक आ.क. कुरुंदवाडे होते. संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक व पालक या वेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक सौ. वसवाडे (एम.ए.) यांनी केले तर आभार पर्यवेक्षक डी. टी. काटकार यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा