विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध : आमदार यड्रावकर
शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जिल्हा परिषदेचा विद्यार्थी हा गुणवत्ताधारक झाला पाहिजे, यासाठी राज्य शासन व शिक्षण विभाग प्रयत्नशील असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक शिक्षण आणि उपक्रमशीलतेवर भर दिला जात आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सोमवार, १६ जून रोजी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. कोथळी जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत पहिली इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनींना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते.
या प्रसंगी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना बालपणापासून आधुनिक शिक्षणाची आणि जीवनमूल्यांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना सक्षम, गुणवत्ताधारक आणि स्पर्धात्मक बनवावे. शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा व शारीरिक व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवावेत. या सर्व उपक्रमांसाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, संजय नांदणे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. यावेळी स्वागतासाठी रंगीबेरंगी सजावट, ढोल-ताशांचा गजर, फुगे, स्वागत गीत आणि पालक-शिक्षक संवाद अशा उपक्रमांनी दिवस संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी केले. अखेरीस पालकांनी शाळेच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा