सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना फटका..

दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट; शिरोळ तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर व जातीच्या दाखल्यासाठी तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. दाखले वेळेत मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही जून-जुलै महिन्यात महाविद्यालयीन व शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज करताना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर दाखला, उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. मात्र हे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

सध्याच्या काळात शासनाने सर्व सेवा ऑनलाईन केल्या असल्या तरी, प्रत्यक्षात दाखल्यांची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. शिवाय अनेकदा ‘सर्व्हर डाऊन’ हा शासकीय यंत्रणेचा नेहमीचा झालेला मुद्दा पुन्हा समोर आला आहे. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सर्व्हर डाऊनमुळे सकाळपासून तहसील कार्यालयात रांगा लागतात, मात्र अनेकांना संध्याकाळपर्यंतही काम न उरकता परतावे लागते.

या गोंधळामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षणाची अंतिम तारीख जवळ आलेली असताना, आवश्यक दाखलेच वेळेवर मिळत नसेल तर विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणावर अन्याय होतो, अशी भावना पालकांमध्ये दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून प्रशासनाने दाखले देण्याची प्रक्रिया गतीमान करावी, अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिक्षणप्रेमी व पालकांकडून केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष