एकही बेघर नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही : आमदार यड्रावकर
जयसिंगपूर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
एकही गरीब व गरजू नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असून, प्रधानमंत्री आवास योजना ही त्याच दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जयसिंगपूर नगरपालिका आणि मी स्वतः सातत्याने प्रयत्नशील आहोत,असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
जयसिंगपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४१ लाभार्थींना घरकुल मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार यड्रावकर होते.
यड्रावकर पुढे म्हणाले, राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून राबवली जाणारी प्रधानमंत्री आवास योजना ही गरिबांसाठी दिलासा देणारी आहे. जयसिंगपूर शहरातील अनेक कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून स्वतःचे घर मिळाले आहे. या योजनेंतर्गत पात्र नागरिकांना निवारा मिळवून देण्यासाठी कोणतीही अडचण येऊ न देता सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नगरपालिका मुख्याधिकारी टीना गवळी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जात असून, शासनाच्या निकषांनुसार पात्र नागरिकांना घरकुलांची मंजुरी देण्यात येत आहे. यापुढेही या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी नगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले.
कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करताना त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले. काही लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आजवर आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. आता स्वतःचे घर मिळणार आहे, याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नगरपालिका प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.
यावेळी माजी नगरसेवक महेश कलकुटगी, जयसिंगपूर नगर परिषदेचे हणमंत मारणुर, प्रमिला माने, स्थापत्य अभियंता अभिषेक कोळी यांच्यासह नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा